चाकण एस टी बसस्थानकाजवळ नुकतेच जन्मलेले.स्त्री जातीचे नवजात अर्भक सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आले.
सुजित अजित काळे वय -२४ रा. अंगारमळा ,आंबेठाण ता.खेड या रिक्षाचालकाने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या अर्भकाच्या नातेवाईकांचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुजित व त्याचा मित्र विनोद भगवान हजारे चाकण एस टी बसस्टँन्ड जवळील रोडवर रिक्षा लावून उभे होते. त्यावेळी एका इलेक्ट्रिक दुकानाशेजारी एका झाडाजवळ नागरिकांची गर्दी दिसली.
ते दोघे त्याठिकाणी गेल्यावर एका गोनपाटामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक रडत असल्याचे आढळून आले.
सदर अर्भक नुकतेच जन्मलेले असून तिच्या आजूबाजूला कोणीही दिसून आले नाही.
त्या अर्भकाला कोणी सोडले याबाबत काहीही माहिती मिळू न शकल्याने त्या दोघांनी सदर अर्भकास रिक्षामध्ये घालून थेट चाकण पोलीस ठाण्यात आणले. अज्ञात महिलेविरूद्ध चाकण पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून चाकण पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.