चपातीच्या तुकड्यासाठी गमावला जीव
Raju Tapal
December 20, 2021
34
इमारतीच्या टेरेसवरून गेलेल्या वीजवाहक तारेवर पडलेला चपातीचा तुकडा पाईपने काढण्याचा प्रयत्न करणा-या दोन लहान मुलांना विजेचा शॉक बसून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी शिरूरमधील गुजरमळ्यात घडली.
या घटनेत दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला असून गंभीर जखमी झालेल्या मुलावर शिरूर येथील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
अरमान जब्बार सय्यद वय -१५ रा.गुजरमळा शिरूर असे विजेचा शॉक बसून मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून मुस्तफा अस्लम मुजावर वय - १५ असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
सुमेर सत्तार काझी यांनी या घटनेची खबर दिल्यानंतर शिरूर पोलीसांनी या अकस्मात घटनेची नोंद घेत गुन्हा दाखल केला.
शिरूर पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनूसार अरमान सय्यद हा आईवडिलांसोबत गुजरमळा येथील रंजना नानासाहेब साकोरे यांच्या इमारतीत दुस-या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहात होता. गुरूवारी त्याचे आई वडील घरी नव्हते. त्यावेळी तो मित्र मुस्तफा याच्यासोबत इमारतीच्या टेरेसवर खेळायला गेला.
या इमारतीवरून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये अडकलेला चपातीचा तुकडा काढण्यासाठी अरमान याने जवळच पडलेला लोखंडी पाईप उचलला. त्या पाईपने चपातीचा तुकडा काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याला शॉक लागला. त्यावेळी तो ओरडू लागताच मुस्तफा हा त्याला वाचविण्यासाठी गेला असता त्यालाही विजेचा जोराचा शॉक लागला. दोघांच्या ओरडण्याच्या आवाजाने इमारतीवरील काही तरूणांनी टेरेसवर धाव घेतली. दोघेही विजेच्या धक्क्याने जखमी होवून पडले होते. विव्हळत होते. जखमी अवस्थेत दोघांना नातेवाईक व स्थानिक तरूणांनी धारिवाल हॉस्पिटल येथे दाखल केले.
अरमान याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुस्तफा याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
Share This