चिपळूणमध्ये २७ एप्रिलपासून बालनाट्य अभिनय कार्यशाळा
चिपळूण : दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या वतीने बालनाट्य अभिनय कार्यशाळा २७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली.
शिबिरासाठी मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेलं मोठं नाव म्हणजे अभिजित झुंजारराव यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. अभिनेता आणि उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. रेगे, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल्स अशा अनेक चित्रपटात, तसेच मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अभिनव कल्याण संस्थेमार्फत त्यांनी अनेक नाटकांचे सादरीकरण करीत अनेक कलाकार घडवले आहेत. नाट्य अभिनयाचं प्राथमिक ज्ञान, मराठी रंगभूमीविषयी प्राथमिक माहिती, नाट्य अभिनयाचं प्रात्यक्षिक, आवाज आणि वाचक अभिनय, शरीर व शरीराच्या हालचाली, भाव व व्यवहार, व्यक्तिरेखा चित्रण, नाटक आणि रंगभूमीचा परिचय, असे या कार्यशाळेचे स्वरूप असणार आहे.
सहभागी बालकलाकारांचे बालनाट्य ५ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर केले जाणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ अशी असेल, तर वयोमर्यादा ८ ते १८ वर्षे अशी असेल. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी ही बालनाट्य अभिनय कार्यशाळा होणार आहे, असेही डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी दिलीप आंब्रे,ॲड. विभावरी रजपूत, प्रा.संगीता जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.