• Total Visitor ( 133534 )

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

Raju Tapal February 09, 2023 46

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. 
स्वयंम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थिती लावून दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. विशेष मुलांच्या हातून केक कापण्यात आला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयंम अँपचे अनावरण, स्वयंमच्या झेप या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयंम अँपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगासाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्री महोदयांनी केली. यावेळी स्वयंमच्या संस्थापक डॉ. निता देवळालकर या उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघातील किसन नगर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागातील मुलांना शालेय वह्या व खाऊचे वाटप मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे उपस्थित होत्या. यावेळी येथील भित्तीचित्राचे अनावरणही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले. 
*आनंद आश्रमात नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्विकार*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त आनंद आश्रमात धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी आनंदआश्रमाच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिक मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी नागरिकांची भेट घेत शुभेच्छांचा स्विकार केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

Share This

titwala-news

Advertisement