नारळ संशोधन केंद्रांतर्फे नाटे येथे शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे तालुक्यातील नाटे येथे एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान प्रकल्पांतर्गत या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नाटे ग्रामपंचायतीच्या समन्वयाने करण्यात आले होते. प्रशिक्षण वर्गाला सरपंच संदीप बांदकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, बैंक व्यवस्थापक के. राजेशकुमार उपस्थित होते. संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी मसालावर्गीय पिकांची भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन केले. तसेच मसाला पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
तसेच संशोधन अधिकारी डॉ. सुनील घवाळे यांनी काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग लागवड यावर, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी मसाला पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, तर मसाला पिकांच्या सुधारित जाती यावर लांजा येथील कृषी तंत्र विद्यालयाचे कनिष्ठ संशोधन सहायक आर. जी. कदम यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गात जायफळ व दालचिनी कलमांचे वाटप करण्यात आले. डॉ. सुनील घवाळे यांनी सूत्रसंचालन केले.