प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घाला ; ह.भ.प. कुमारी निलम महाराज शितोळे
शिक्रापूर:- प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घाला असे प्रतिपादन नारायण महाराज बेट येथील ह.भ.प. कुमारी निलम महाराज शितोळे यांनी हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे केले. शिरूर तालुक्यातील करंदी येथील लिलाबाई दत्तोबा ढोकले यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रियाविधी आज रविवार दि.४ जानेवारी २०२६ रोजी कोरेगाव मूळ येथील मुळा- मूठा नदीकाठी स्मशानभूमीत आयोजित केला होता. कै.लिलाबाई दत्तोबा ढोकले यांचे जावई कांतीलालशेठ साबळे विलासराव वाघ,विजयराव ढमढेरे परिवाराने दशक्रिया विधी निमित्त आयोजित केलेल्या प्रवचनात ह.भ.प.कुमारी निलम महाराज शितोळे बोलत होत्या. माणूस किती बुद्धीमान आहे हे सांगताना ह.भ.प.शितोळे महाराज म्हणाल्या,हत्तीसारखे बलाढ्य प्राणी आम्ही आमच्या ताब्यात घेतो.सापासारखे विशाल प्राणी आम्ही आमच्या हातात धरतो. सुगरण नावाचा पक्षी घरटे बांधताना जेवढा विचार करतो तेवढा विचार आपण करत नाही. पक्षी जेवढा गोड संसार करतात तेवढा गोड संसार माणसं करत नाही. प्रपंच करत असताना आपण परमार्थ करतो का हो ? असा सवाल उपस्थितांना करून ह.भ.प.कुमारी निलम महाराज शितोळे प्रवचनात पुढे बोलताना म्हणाल्या, प्रपंच करत असताना आपल्याकडून भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान,निराधाराला आधार,अनाथाला आधार आपण दिला पाहिजे.गर्व कोणत्याच गोष्टीचा करू नका. याला वाईट बोल,त्याला वाईट बोल,याची निंदा कर,त्याची निंदा कर याला परमार्थ म्हणत नाही. तुकाराम महाराजांना जावून ३७५ वर्षे झाली.वयाच्या ४२ व्या वर्षी तुकाराम महाराज गेले. आजही संत तुकोबारायांच्या पुढे,मागे लाखोंची गर्दी आहे.एवढे तुकाराम महाराजांचे वैभव होते.प्रपंच आणि परमार्थाची सांगड त्यांनी घातली होती. आपण बुद्धीचा वापर चांगला करून घेत नाही.आपण जीवन जगत असताना जीवनाचं सोनं करून घेत नाही. जीवन जगत असताना आपल्या गळ्यात तुळशीची माळ धारण करा.जीवन जगत असताना आई फार महत्त्वाची असते.कशाचाही गर्व करू नका. संतांच्या चरणी मस्तक ठेवा.संतांच्या पावलांवर पाऊल ठेवून चला.आई -वडिलांची सेवा करा.जीवन जगत असताना मुलांवर चांगले संस्कार करा.कर्म चांगले करा असे आवाहन उपस्थित श्रोत्यांसमोर ह.भ.प. कुमारी निलम महाराज शितोळे यांनी केले. दशक्रिया विधीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष कांचन,शिवसेनेचे आप्पासाहेब कड देशमुख,सामाजिक कार्यकर्ते सचिन माऊली कड देशमुख,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोकराव गायकवाड, उल्हासराव गरूड,अशुतोष ढमढेरे, गणेशराव धुमाळ,शैलेशराव घोरपडे,मुकूंदराव ढोकले,संजय सोमवंशी,नितेश खोत,अमित भालेराव,प्रवीण उजेकर,रामचंद्र ढोकले,रामदास ढोकले,पंढरीनाथ ढोकले,रूपेशराव ढमढेरे,दादासाहेब ढोकले,संतोष ढोकले पाटील यांच्यासह ढोकले,साबळे,वाघ,ढमढेरे,कड देशमुख परिवाराचे शिरूर,हवेली,पारनेर,भोर,मावळ,खेड तालुक्यातील पाहुणे मंडळी,महिला तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार,उद्योग,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी दशक्रिया विधीस उपस्थित होते.