मुरबाडमध्ये ठाणे जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन
मुरबाड :- तरुण पिढीमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी,भजनी कलेला प्रोत्साहन मिळावे आणि कलाकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने वारकरी संप्रदाय,मुरबाड तालुक्याच्या वतीने अधिक मासानिमित्त ठाणे जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार,दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत माऊली गार्डन हॉल,म्हसा रोड,मुरबाड येथे पार पडणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुक कलाकारांनी प्रथम फेरीसाठी आपल्या आवाजातील दोन ते तीन मिनिटांचे भजन ९२७२७ ७१३०९ या क्रमांकावर पाठवायचे आहे. निवड झालेल्या स्पर्धकांसाठी दुसरी फेरी २० मिनिटांची असणार असून त्यामध्ये एक श्लोक,दोन अभंग आणि एक गवळण सादर करावी लागणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संतोष गजानन चौधरी व डॉ. संजय घुडे यांनी केले असून,‘आवाज महाराष्ट्राचा’ आणि ‘सारेगम’ फेम गायक महेशजी कंटे यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळे,गायक व कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या भजन स्पर्धेला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.