आयुक्तांच्या आदेशाने ठाकूरपाड्यातील रस्त्याच्या कामाला वेग
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळ्यातील ठाकूरपाडा येथील महापालिकेच्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धडाचा रस्ता नाही याबाबत टिटवाळा न्यूजने सोमवारी परखड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चक्क आयुक्त अभिनव गोयल यांनी या वृत्ताची दखल घेत सदरील कामाकडे वैक्तिक लक्ष द्या अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने गेल्या मंगळवार पासून येथे सुरू असलेल्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई दिसून आली नाही. त्यामुळे भर पावसात का होईना येथे काम सुरूच आहे. गुरुवारी अ प्रभागातील उपअभियंता हारून इनामदार,कनिष्ठ अभियंता ओमकार भोईर यांनी जाग्यावर जाऊन कामाची पाहणी केली. अत्यंत चिखलमय असलेल्या रस्त्यातून त्यांनी जात ज्याठिकाणी पाणी भरते त्या ठिकाणची पाहणी करीत शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने त्या ठिकाणी सपाटीकरण करण्याबरोबरच खडी टाकून तेथील खड्डा लेव्हल करणार असल्याचे सांगितले. तथापी इनामदार यांनी सदरील रस्ता हा फॉरेस्ट काही खाजगी जागा मालकांच्या जागेतून जात असल्याने याला अडथळे येत आहेत. मात्र संबंधित जागेधारकांनी योग्य तो टीडीआर घेऊन किंवा रस्त्याच्या कामास एनओसी दिल्यास काम करण्यास सोपे जाईल असे सांगितले.
तरीपण आपण विद्यार्थी व पालकांना जाण्यासाठी योग्य तो सुस्थितीत रस्ता करून देणार असल्याचे सांगितले.