• Total Visitor ( 133096 )

ग्रामीण भागात काँक्रीटचे रस्ते

Raju tapal March 08, 2025 29

ग्रामीण भागात काँक्रीटचे रस्ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
शिक्षणासाठीची १०० टक्के सवलतीची योजनाही सुरूच राहणार 

मुंबई:-ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनातील चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी विविध घोषणा केल्या. पंतप्रधान आवास योजनेतील २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा पुरविली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना शुक्रवारी विधानसभेत दिली.

ग्रामीण भागातील १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसेच एक हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे चार हजार गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येईल. ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ला याबाबत अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, पालकांचे वार्षिक आठ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना पदवी व पदव्युत्तरपर्यंत शिक्षणासाठी १०० टक्के सवलतीची योजना यापुढेही सुरू राहणार आहे. याबाबत खोटा प्रचार केला जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण सहा महिने आहे. यामध्ये पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असून योजनेद्वारे ११ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. नवीन योजनेतून ही कुटुंबे घरावर सोलर पॅनल बसवू शकतील व वीज बिलमुक्त होतील. १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के घरगुती ग्राहकांना दर कपातीचा थेट लाभ मिळेल. ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले, तर दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत मिळेल, असे ते म्हणाले. महत्त्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ४२६ किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भात दुष्काळ दिसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
 

Share This

titwala-news

Advertisement