कंटेनरच्या धक्क्याने एस टी बसचालक ठार ; लासलगाव येथील घटना
Raju Tapal
October 31, 2021
394
कंटेनरने दिलेल्या धक्क्याने एस टी बसचालक ठार झाल्याची घटना लासलगाव बसस्थानक परिसरात घडली.
लासलगाव आगाराची लासलगाव ते तुळजापूर ही एम एच १४ - ३६४१ या क्रमांकाची एस टी बस आगारात प्रवेश करत असताना एम एच वाय ४७६३ ने जोरात धक्का दिल्याने एस टी बसचालक एस पी निकम खाली उतरून पाहणी करत असताना कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले.
बसचालक एस पी निकम हे नाशिक येथून लासलगाव येथे आल्यानंतर सकाळी बसस्थानकात आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांच्याबरोबर चहा घेतला. आगारातून बसस्थानकात रस्त्याने आत येत असताना बसला कंटेनरने धक्का दिला. त्यानंतर भरधाव वेगाने बसस्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार ,सलीमभाई कलरवाले यांच्या दुकानांना धडक देत एका स्कुटीला धडक दिल्यानंतर कंटेनर थांबला. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पोंभुर्णा येथे झालेल्या दुस-या घटनेत धान कापणीसाठी लागणा-या विळा विक्रीचा व्यवसाय करणा-या दुचाकीस्वार बाप लेकीला अवैध वाळू वाहतूक करणा-या भरधाव ट्रॅक्टरने धडक देवून उडविले. या घटनेत मुलगी व वडील गंभीर जखमी झाले.
वढकुली नाल्यातून अवैधरित्या वाळू चोरी करून वाळूवाहतूक करताना एम एच ३४ बी जी २३१५ या क्रमांकाचे ट्रॅक्टर चालक लक्ष्मण नेवारे याने भरधाव ट्रॅक्टर चालवून चेक फुटाणा येथील राजू मेश्राम वय ३८ , मुलगी धनश्री मेश्राम वय १० यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांचेही पाय मोडल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले
Share This