• Total Visitor ( 369924 )
News photo

केडीएमसीच्या नव्या प्रभाग रचनेला न्यायालयीन याचिकेचा अडसर

Raju tapal June 04, 2025 85

केडीएमसीच्या नव्या प्रभाग रचनेला न्यायालयीन याचिकेचा अडसर



२७ गावांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध



कल्याण :- राज्यातील महापालिकांचा निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या. राजकीय पक्षही कामाला लागले. या आधी महापालिकेतील २७ गावे वगळण्याच्या विषयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. निवडणुकीसाठी बहुसदस्यीय (पॅनल) पद्धतीची प्रभाग रचना न करता एक सदस्य पद्धतीचीच प्रभाग रचना असावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. या याचिकांमुळे नव्या प्रभागाची रचना होणार की नाही, या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



बहुसदस्य पद्धतीची प्रभाग रचना महापालिकेने यापूर्वी तयार केली होती. ती रद्द करण्यात आली. या बहुसदस्यीय प्रभाग रचनेला हरकत घेणारी याचिका वास्तुविशारद संदीप पाटील यांनी प्रथम उच्च न्यायालयात दाखल केली.



राज्यभरातून अन्य पाच जणांच्या याचिका होत्या. एकूण सहा याचिका आणि एक जनहित याचिका यांच्यावर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यांनी पुन्हा रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. ही पिटीशनही न्यायालयाने फेटाळून लावली. आता पुन्हा ते क्युरेटीव्ह पिटीशन येत्या सात दिवसांत दाखल करणार आहेत. त्यांच्या मते एक सदस्यीय पद्धतीने महापालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत.



याशिवाय २०१५ साली २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. ती वगळण्याची मागणी जोर धरू लागली. गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी केली गेली. महाविकास आघाडीच्या सरकारने २७पैकी १८ गावे महापालिकेतून वगळून ९ गावे महापालिकेत ठेवली. या निर्णयाला पाटील यांनी पुन्हा आव्हान दिले.



प्रभाग रचनेच्या कामाला अद्याप सुरुवात नाही



त्यामुळे प्रभाग रचना करताना महापालिकेस या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन प्रभाग रचना करावी लागणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे काम पाहणारे उपायुक्त रमेश मिसाळ म्हणाले की, प्रभाग रचनेबाबत आम्हाला निवडणूक आयोगाकडून अद्याप तरी काही एक सूचना आलेली नाही. केवळ प्राथमिक माहिती आयोगाने मागविली आहे. ती तयार करून देण्याचे काम सध्या सुरू आहे.



बेकायदा प्रभाग रचनेचा पायंडा मोडीत काढावा



माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे मागणी केली की, महापालिकेच्या यापूर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना उंबर्डे येथून केली गेली. वास्तविक प्रभाग रचना ही टिटवाळा वासुंद्री येथून केली पाहिजे. प्रभाग रचना उत्तरेकडून केली गेली पाहिजे. टिटवाळा वासुंद्री हे उत्तरेस आहे. त्या ठिकाणाहून प्रभाग रचना करणे उचित ठरणार आहे. उंबर्डे येथून केली जाणारी प्रभाग रचना ही सदोष आणि बेकायदेशीर आहे. टिटवाळा येथून प्रभाग रचनेची सुरुवात केली जावी.



केलेली प्रभाग रचना कोरोनामुळे बारगळली



मध्यंतरी प्रभाग रचना करून केडीएमसीने ती प्रकाशित केली होती. त्यासाठी आरक्षणही काढले होते. मात्र कोरोनामुळे हे सगळे बारगळले गेले. त्याचे पुढे काय झाले हे कळले नाही. आता सगळ्यांच्या नजरा न्यायालयाकडे लागल्या आहेत.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement