दापोली पुणे शिवशाहीचा अपघात; तीन जण जखमी
दापोली-पुणे या दुपारी दोनच्या गाडीला बुधवार दि. २ एप्रिल रोजी महाड रेवतळे फाटा येथे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे तीन प्रवासी जखमी झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे महेंद्र चौरसिया, सुरज जाधव, विकास राठोड अशी असून त्यांना बर्थडे येथील रायगड क्लिनिक या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबतची माहिती महाड एसटी आगाराला प्राप्त होताच एसटीचे पथक व रुग्णवाहिका तातडीने या ठिकाणी व गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली-पुणे या शिवशाही बसला रेवतळे येथील वळणावर अपघात झाला. वळण असल्याने चालकाने वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला असता ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्परतेने मोठी दुर्घटना टाळण्यासाठी समोरील कंपाऊंड वाॅल असलेल्या गटारात गाडी घातली, त्यामुळे गाडी थांबली. मात्र या प्रयत्नात तीन प्रवासी जखमी झाले. या गाडीमध्ये एकूण बावीस प्रवासी प्रवास करीत होते.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर प्रवाशांनी दिली. तसेच भंगार, नादुरुस्त शिवशाही बस बंद कराव्यात अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांच्या जीवाचा खेळ करणा-या अशा बस बंद करणार का आणि चांगल्या गाड्या अस्तित्वात आणून नियोजित वेळेत त्या सोडणार का ? असे अनेक प्रश्न या अपघातानंतर पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहेत.
एकंदरीत शिवशाही बस भंगार झाल्या असून या गाड्यांचे मेंटनस व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवशाही बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार व अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राज्यकर्ते मात्र सोयीप्रमाणे एस.टी. महामंडळाकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.