केडीएमसीच्या माजी नगरसेवकाचा अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला
खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल....
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'अ' प्रभाग क्षेत्र कार्यालय हद्दीतील वडवली परिसरात बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालिकेच्या कारवाई पथकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकासह त्याच्या मुलाने कारवाई रोखण्यासाठी अधिकारी,कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत माजी नगरसेवक दुर्योधन पाटील व त्यांच्या दोन मुलांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
'अ' प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम कारवाई पथकाला वडवली गावात निर्मल लाईफ स्टाईल समोर सुरु असलेल्या बेकायदा बांधकामाची माहिती मिळाली होती. त्यानुसार अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे,अधीक्षक शिरीष गर्गे यांच्यासह आशिष टाक,विलास साळवी,रमेश भाकरे आणि इतर कर्मचारी सर्वेक्षणासाठी तेथे पोहोचले. अनधिकृत बांधकामांची पाहणी सुरू असताना तेथे वैभव दुर्योधन पाटील व पंकज दुर्योधन पाटील यांनी आपल्या साथीदारांसह येऊन कारवाई पथकाला तुम्ही आमच्या साईटवर का आले. कोणाला विचारून आले..? तुमची हिम्मतच कशी झाली येथे यायची. तुम्हाला मी बघून घेईल तुमची बदली करील. तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे. असे सांगत वडील दुर्योधन पाटील यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर थोड्याच वेळात दुर्योधन पाटील हे हातात लाकडी दांडका घेऊन आले व त्यांनी सर्वेक्षणास मज्जाव करीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अधिकाऱ्यांनी आणलेली टाटा सुमोची काच फोडून टाकली. बेसावध असलेल्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांनी लपून व पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबत दुर्योधन पाटील(वय ५५),वैभव दुर्योधन पाटील(वय ३०) व पंकज दुर्योधन पाटील(वय २६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक रामचंद्र जाधव हे करीत आहेत. तर माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. प्रत्येक रूममागे अधिकारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
त्या अनधिकृत 'चाळी" कोणाच्या ...?
केडीएमसीच्या तत्कालीन आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी अ प्रभागातील अनधिकृत चाळी व आरसीसी ईमारतीच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे कडक आदेश दिलेले होते त्याच प्रमाणे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तब्बल दोन हजारांच्या वर अनधिकृत चाळींचे बांधकामे निष्कासित केले असताना वडवलीतील निर्मल लाईफ स्टाईल समोर सुरु असलेल्या त्या अनधिकृत चाळींवर कारवाई का गेली नाही त्या चाली कोणाच्या असा प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित होत असून अटाळी,वडवली येथील आरसीसी इमारतीच्या बांधकामांवर का कारवाई करण्यात येत नाही असाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तर राजेंद्र साळुंखे यांनी आपल्याला रिव्हॉल्वर दाखवून मारहाण केली असे सांगत असताना एफआयआर मध्ये तसा उल्लेख का घेण्यात आला नाही. कोणाचा दबाब पोलिसांवर किंवा यासंबंधित अधिकाऱ्यांवर आला हा हि विषय अधोरेखित होत आहे.