देहुगाव येथील इंद्रायणी नदीत दोन लहान मुले बुडाली
देहूगाव येथील माळीनगर बायपासच्या इंद्रायणी नदीपुलाखाली दोन लहान मुले बुडाल्याची घटना शुक्रवारी दि.२६ नोव्हेबरला सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली असून शोधकार्य सुरू आहे.
साहील विजय गौड वय - १० वर्षे, अखिल विजय गौड वय - ८ वर्षे रा.सध्या सिध्देश्वर मंदीराजवळ देहूगाव ,मुळगाव देवरिया कुशीनगर ,गोरखपूर अशी बुडालेल्या दोघा सख्ख्या भावांची नावे आहेत.
ही दोन्ही मुले इंद्रायणी नदीकाठी गेली होती. कार्तिकी एकादशी असल्याने नदीला पाणी सोडण्यात आले आहे. वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात असून ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हवेली तहसीलदार गीता गायकवाड तलाठी अतुल गीते हेही घटनास्थळाकडे रवाना झाले.
दुस-या घडलेल्या घटनेत बारामती तालुक्यातील सोनगाव येथे अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाच्या भीतीने पळ काढताना निरा नदीवरील बंधा-यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मंगलेश अशोक भोसले.वय - ४५ रा.सोनगाव ता.बारामती असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव असून अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता भीतीपोटी त्याने पळ काढताना नीरा नदीवरील बंधा-यात त्याने उडी मारली.दम लागल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
यावेळी संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते.