रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून
Raju tapal
October 29, 2024
13
रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून;
देवगड कुणकेश्वर समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
दुर्घटनाग्रस्त रत्नागिरी येथील नौकेचे कोट्यावधीचे नुकसान
पोलिसांनी घेतले संशयित खलाशास घेतले ताब्यात
या नौकेवरील तांडेल धरून एकूण २६ खलाशी होते.
रत्नागिरी:-मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना देवगड समुद्रात सोमवारी घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. कोस्टगार्डच्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील समुद्रात रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या होत्या.त्यामध्ये रत्नागिरी राजीवडा येथील रफिक फणसोपकर यांची बोट मच्छीमारीसाठी देवगड बंदरात गेलेली होती. मच्छीमारी करत असतानाच मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलाचे डोके कापले आणि ते डोकं बोटीवर ठेवून दिले. त्यानंतर संपूर्ण बोटीला आग लावली.दरम्यान घटनास्थळी गस्तीनौकेने गेलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. व देवगड येथे देवगड बंदरात आणले व त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा राहणारा छत्तीसगड हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते
या आगीमध्ये बोट मालकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आजूबाजुला असलेल्या रत्नागिरीतील काही मच्छीमार बोटीवरील लोकांनी जळणा-या बोटीवरच्या तीस ते पस्तीस लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर कोस्टगार्डला पाचारण करण्यात येऊन बोटीवरच्या इतर खलाशांचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेतील मृत तांडेल हा जयगड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील मच्छिमार व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की रत्नागिरी येथील राजीवाडा येथील नुमान रफिक फणसोफकर यांच्या मालकीची नुझत राबिया ही नौका रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारी करिता निघाली होती.सोमवारी कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी व तांडेल यांच्यात वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्यानंतर नौकेवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर राहणारा गुहागर याचा खून करून नौका पेटवून दिली. विश्वकर्मा याने नौका पेटविल्यानंतर नौकेमागील असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.नौकेने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच व नौकेवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने केलेली आरडाओरड ऐकून नजीकच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा व नौकेवरील खलाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नौकेवरील तांडेल धरून एकूण २६ खलाशी होते.
याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली .त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस शाखेस माहिती दिली. सागर पोलीस शाखेच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले.यावेळी देवगड बंदरातून माळसा मल्हार या नौकेने घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा शर्तीचे प्रयत्न केला त्याबरोबर घटनास्थळी असलेल्या इतर नौकेने आटोकाट प्रयत्न केला.या नौकेतून स्थानिक मच्छीमार सागर सुरक्षा पोलीस शाखेचे कर्मचारी यांनी धाव घेऊन नौकेवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच खलाशांना देवगड बंदरात रत्नागिरी येथील मीनाक्षी नौकेवरून आणण्यात येत आहे.
घटनास्थळी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सागर सुरक्षा पोलीस शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणपत दर्वेश, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एफ जे आगा, पोलीस हवालदार आशिष कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, स्वप्निल ठोंबरे, महिला पोलीस नाईक प्राची धोपटे, प्राजक्ता कविटकर, सर्वेश नाटेकर ,निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, संजय गांधी नायब तहसीलदार सुरेंद्र कांबळे, मंडल निरीक्षक पावसकर, प्रदीप कदम मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर जेटी येथे येऊन घटनेची माहिती घेतली.यावेळी सागर पोलीस शाखेचे कर्मचारी , सागरी सुरक्षा रक्षक, मच्छीमार बांधव व नागरी उपस्थित होते .
समुद्रात एवढी मोठी घटना घडून देखील एकही आपत्ती यंत्रणा देवगड येथे उपलब्ध नसल्याने उपस्थित मच्छीमारांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार देवगड मध्ये वारंवार घडत असल्याचेही यावेळी मच्छीमार बांधवांनी सांगितले.
Share This