ज्ञानेश्वरी सोडून आपला आध्यात्मिक उत्कर्ष होईल या भ्रमात कोणी राहू नका
Raju Tapal
August 21, 2022
38
ज्ञानेश्वरी सोडून आपला आध्यात्मिक उत्कर्ष होईल या भ्रमात कोणी राहू नका - भागवताचार्य विजयानंद महाराज यांचे आवाहन
ज्ञानेश्वरी सोडून आपला आध्यात्मिक उत्कर्ष होईल या भ्रमात कोणी राहू नका .ज्यांना आत्मकल्याण साधायची इच्छा आहे त्यांनी ज्ञानेश्वरी आणि भागवत या दोन ग्रंथांना हृदयाशी कवटाळून त्यांची उपासना करा असे आवाहन भागवताचार्य ह.भ.प. विजयानंद महाराज यांनी केले.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप शुक्रवारी झाला. हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप करताना भागवताचार्य ह.भ.प. विजयानंद महाराज बोलत होते.
भागवताचार्य ह.भ.प.अनुपानंद महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
संत उपदेश करत असतात. संतांचा उपदेश तुमच्या माझ्या परमकल्याणासाठी केलेला असतो असे सांगून पुढे बोलताना भागवताचार्य ह.भ.प. विजयानंद महाराज म्हणाले की, वर्तमानकाळ तुमच्या माझ्या हातात आहे. काल काय झालं त्याचाच इतिहास वाचत नका बसू. पुढे काय होणार आहे त्याची चिंता, काळजी करू नका. मागच्याचा विचार करू नका. वर्तमानाचा विचार करायचा आहे. धडधाकट शरीर आहे. मी भजन करून माझा उत्कर्ष ,मी भजन करून माझी प्रगती, मला जे जे पाहिजे ते मी हस्तगत करू शकतो त्यासाठी फक्त नामाचा सहारा करणे गरजेची गोष्ट आहे असे भागवताचार्य विजयानंद महाराज यांनी यावेळी सांगितले.
आता मोजके भक्त हरिमंदीरात येत असतात.मंदीर भव्यदिव्य बांधलेले आहे पण त्यामध्ये भक्त पाहायला मिळत नाही अशी खंत व्यक्त करून भागवताचार्य ह.भ.प. विजयानंद महाराज म्हणाले बाह्यांग पुष्कळ चांगलं आहे पण अंतरंगाचा मागमूस लागत नाही. साधूच्या मागे संतांच्या मागे,देवाच्या मागे चालण्याचा बरेच जण प्रयत्न करतात पण देव,संत मागे चालू देत नाही. एकमेकाच्या भक्तीमार्गात चालत असलेल्या,होत असलेल्या शास्त्रीय दृष्टीकोनातून ज्या चुका आहेत त्याकडे दुर्लक्ष करायचं .भजन करतो ही मोठी जमेची बाजू असल्याचे भागवताचार्य विजयानंद महाराज यांनी यावेळी सांगितले.
भागवताचार्य ह.भ.प. अनुपानंद महाराज यांच्या हस्ते ग्रामस्थ , भाविक महिला, लहानमुले, वयोवृद्धांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सायंकाळी हारी जय जय राम ,रामकृष्ण हारी, ज्ञानोबा तुकाराम ,राधा कृष्ण ,राधा कृष्ण या जयघोषात टाळ मृदंगाच्या साथीत भगवे झेंडे हातात घेवून दिंडी प्रदक्षिणेस सुरूवात करण्यात आली.
दिंडी प्रदक्षिणा मारूती मंदिर पटांगणावर आल्यानंतर दिंडी प्रदक्षिणेत सहभागी झालेल्या महिलांनी राधे खेळ गं फुगडी या गीताच्या ठेक्यावर फुगड्यांचा खेळ खेळला. टाळ मृदंग, भगवे झेंडे ,जय जय रामकृष्ण हारी, ज्ञानोबा तुकाराम,ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने कोंढापुरीतील वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठल रूक्मिणी मंदीर, ग्रामपंचायत कार्यालय ,मारूती मंदीर,पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरैग्य उपकेंद्र ,जुनी ग्रामपंचायत कार्यालय इमारत, पुणे - नगर राज्य महामार्ग, या मार्गे दिंडी प्रदक्षिणा घालण्यात येवून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मारूती मंदीर ,भैरवनाथ मंदीर पटांगण ,गावचे प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, गणेगाव खालसा रस्ता, महादेव मंदिर,विठ्ठल रूक्मिणी मंदीर अशी ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहसोहळ्याचा समारोप करण्यात आला.
Share This