आपत्ती व्यवस्थापनाची बुधवारी बैठक
चिपळूण : येथील पालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बुधवारी २ एप्रिलला सकाळी ११ वाजता सांस्कृतिक केंद्रात बोलावली आहे. त्यामुळे एप्रिलपासून आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना सुरवात होणार आहे.
चिपळूण शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरते आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात शिरल्यानंतर पालिकेच्या आपत्ती निवारण विभागाचे काम सुरू होते. पावसाळ्यात पूरपरिस्थितीला सामोरे जाताना शहरातील नागरिकांचे आणि मालमत्तेचे फार नुकसान होऊ नये यासाठी जूनअखेर पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना सुरू केल्या जातात. पावसाळा तोंडावर असताना या उपाययोजना सुरू झाल्यानंतर कधी निधीची अडचण होते, तर कधी शासकीय कार्यालयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करता येत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करून पालिकेने यावर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालिकेसह महसूल सार्वजनिक बांधकाम महावितरण जिल्हा परिषद आरोग्य विभाग पोलिस प्रशासन आणि इतर सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली आहे, कोणत्या गोष्टीवर काम करणे गरजेचे आहे आणि शासनाकडून कोणते सहकार्य लागेल, पालिकेची कोणती तयारी सुरू आहे या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तसेच सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जाणार आहेत.