डोंबिवलीच्या लोकसेवा समितीचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान . . !
लोकसेवा समिती डोंबिवली या सामाजिक संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसेवा समितीच्या 25 कलमी कार्यक्रमांपैकी हा चौथा उपक्रम आहे.
डोंबिवली पूर्वेला दत्तनगर येथे पूर्व पश्चिम राहणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत हजारो नागरिक येत असतात. या नागरिकांना स्वच्छ जागा उपलब्ध व्हावी, आजूबाजूला वाढलेली झाडी साफ करून त्यांना बसण्यासाठी चांगली सोय करण्यात आली. लहान बाळे आणि विशिष्ट समाजातील व्यक्तींचे दफन केले जाते ती जागा साफ करण्यात आली. यावेळी सारा परिसर झाडूने स्वच्छ करून पाण्याने धुऊनही काढण्यात आला. ब्लिचिंग पावडर टाकून परिसर निर्जतुक करण्यात आला.
अभियानाचा समारोप झाल्यानंतर लोकसेवा सामितीचे कार्यकर्ते अनंतात विलीन झाले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र परब, सचिव विजय साईल, राजाजी पथचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर तसेच लोकसेवा समितीचे ज्येष्ठ, तरुण कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. विशेषतः ओमकार परब, तन्मय परब, श्रेया देसाई, पूजा परब आदी तरुण मुले या अभियानात सामील झाली होती.