डोंबिवलीतील तरुण गोरखपूर ते काठमांडू अनवाणी धावणार,
११०० किमी अंतर २२ दिवसात पार करणार
डोंबिवली- येथील निवासी असलेला एक तरुण गोरखपूर (उत्तरप्रदेश) ते काठमांडू (नेपाळ) हे अकराशे किलोमीटरचे अंतर २२ दिवसात पार करण्यास सज्ज झाला आहे. हे अंतर विहित वेळेत कापण्यासाठी तो दररोज ५० किमी धावणार आहे. २६ मार्च रोजी या मोहिमेला सुरुवात होऊन १७ एप्रिलला हा तरुण आपले इच्छित लक्ष्य साध्य करणार आहे.
धावण्यातून मिळणारी उर्जा आणि सुदृढ आरोग्याचा संदेश या धावण्यातून तो २२ दिवसांच्या कालावधीत वाटेवर येणाऱ्या गाव, शहरातील नागरिकांना देणार आहे.
विशाख कृष्णस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी विमा कंपनीत नोकरी करतो. वाणीज्य शाखेचा पदवीधर असलेला विशाख कुटुंबियांसह डोंबिवलीत राहतो. गेल्या वर्षी विशाखने डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात दररोज साडे पाच तास ४२ किमी धाऊन यापूर्वीचा एक विश्वविक्रम मोडीत काढला. आणि स्वताच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद केली होती.
याच विश्वविक्रमातून प्रेरणा घेऊन विशाखने गोरखपूर ते काठमांडू हे ११०० किमीचे अंतर २२ दिवसात पार करण्याचा निर्णय घेतला आहे. या धावण्याच्या वेळी तो कोणत्याही प्रकारचे बूट, चप्पलचा वापर करणार नाही. हे त्याच्या धावण्याचे यावेळचे वैशिष्ट्य असणार आहे. अनवाणी धाऊन दुसरा विश्वविक्रम करण्याचा त्याचा मानस आहे.
शालेय जीवनापासून विशाखला धावण्याची आवड आहे. बारही महिने तो डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात धावण्याचा सराव करतो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस असुनही विशाखने आपल्या धावण्यात कधीच खंड पडू दिला नाही.
येत्या काळात मनाली ते लेह हे ४२० किमीचे अंतर चार दिवसात पार करण्याचा विशाखचा मानस आहे. एक महिना दररोज ७० किमी धावण्याचा उच्चांक, ११९ दिवसात १० किमी अंतर कापण्याचे ध्येय विशाखने ठेवले आहे. येत्या काळात तो या मोहिमा हाती घेणार आहे. गोरखपूर ते काठमांडु स्पर्धेसाठी विशाख पुरस्कर्ते मिळण्याच्या प्रयत्नात आहे. इच्छुकांनी ७०४५५१८९२२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन विशाखने केले आहे.