डोंगरची काळी मैना, करवंदे घ्या ...करवंदे घ्या अशी मोठ्या,आर्त आवाजात भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील शाळा शिकत असलेली लहान मुले डोंगरची काळी मैना ,करवंदे रस्त्यावर विकून आपला शाळेचा खर्च भागविण्यासाठी ,कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.
हिर्डोशी, धामणदेववाडी येथील शाळेत जाणारी मुले मुली पहाटे उठून रानातून करवंदे तोडून आणून ती भर उन्हाळ्याच्या दिवसांत भोर - महाड रस्त्यावर दिवसभर विकत आहेत.
हातात करवंदाची वाटी घेवून रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून येणा-या गाडीकडे लक्ष ठेवून गाडी आलेली पाहताच हातातील करवंदे गाडीवाल्याला दाखवत करवंदे घ्या करवंदे घ्या डोंगरची काळी मैना असा आर्त आवाज देवून करवंदे विकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
शाळा सुरू होईपर्यंत करवंदे विकून रोजच्या कमाईतून मिळालेल्या पैशांचा वापर शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तके ड्रेस फी यासाठी करत असल्याने या दुर्गम भागातील होतकरू कष्टाळू मुले अप्रत्यक्ष आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.