'फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट;
Raju tapal
December 03, 2024
21
'फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट;
कोकणासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
पुणे:- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याचे जाणवत आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होऊन हे तापमान वाढले असून आता या सोबत राज्यात पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवेतील कमी झालेली आर्द्रता, कोरडे वातावरण व उत्तरेकडून येणारे वारे यामुळे राज्यात गारवा वाढला होता. गेले काही दिवस कडाक्याची थंडी नागरिक अनुभवत होते. मात्र, पुण्यात तर महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले होते. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात रविवारी १३.३ अंश सेल्सियस, तर सोमवारी १७.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ७ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येत आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता व दमटपणा वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील चारही उपविभागात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी ५ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस शहरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत देखील किमान तापमान हे १२ अंश सेल्सिअस होते. तर जालना, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान हे १३ अंश सेल्सिअस राहणार आहे. लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत देखील पुढील ३ दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share This