एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एन्ट्री
Raju Tapal
March 28, 2023
63
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एन्ट्री
मुंबई:-एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.सध्या दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत.जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दया नायक यांचाही समावेश असून ते मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत.
दया नायक सध्या दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. 2021 मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण देण्यात आले होते. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.पोलीस दलात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर, नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून अनेक एन्काऊंटरही केले आहेत. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.
कोण आहेत दया नायक?
1995 मध्ये दया नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.
पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले दया नायक यांची कारकिर्द काहीशी वादग्रस्तदेखील ठरली. बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती. पुढे ACB ने कोणतेही पुरावे न दिल्याने नायक यांना क्लिन चीट मिळाली. 2012 मध्ये नायक यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले. त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बदली नागपूर येथे करण्यात आली. त्या ठिकाणी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे 2016 मध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेत मुंबईत त्यांची पोस्टिंग करण्यात आली.
Share This