भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती बिघडली;
रुग्णालयात दाखल
मुंबई:-भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. आठवड्यापासून त्याची प्रकृती बरी नव्हती. प्रकृती ढासळल्याने त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री उशीरा त्याला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमधून समोर आली आहे.
विनोद कांबळी हा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला तो रमाकांत आचरेकर सरांच्या कार्यक्रमात. यावेळी विनोदला सचिन तेंडुलकर भेटला होता आणि या दोघांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर विनोदला बरेच आजार असल्याचेही समजले होते. पण विनोदला मदत करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती समोर आल्या होत्या. यामध्ये विश्वविजेते कर्णधार कपिल देव, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश होता. पण विनोद रिहॅबला जाण्यासाठी तयार असेल, तरच त्याला मदत करणार असल्याचे या दोघांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी आता विनोदला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे.
विनोद कांबळी हा दारूच्या व्यसनातून अनेक शारिरीक आणि मानसिक त्रासांचा सामना करीत असल्याचे म्हटले जात आहे. कांबळी अनेक वैद्यकीय समस्यांचा सामना करीत आहेत. कांबळी यापूर्वी 14 वेळा पुनर्वसन केंद्रात गेला आहे. कांबळी याला हार्टअटॅकही आला होता. यानंतर दारूच्या व्यसनामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. हृदयविकारासोबतच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्याची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही.