माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
शिक्रापूर :- मावळ विधानसभेचे माजी आमदार,शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी दि.३० जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
शिक्षणमहर्षी आणि मावळभुषण या उपाधींचा मान त्यांनी मिळविला होता.
कृष्णराव भेगडे हे १९७२ मध्ये जनसंघाचे आमदार होते.१९७७ साली त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.१९७८ साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले होते.१९९२ आणि १९९४ असे दोनदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
शरद पवार संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देवून केंद्रातून राज्यात पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी शरद पवार यांच्यासाठी कृष्णराव भेगडे यांनी आपल्या विधानपरिषद जागेचा राजीनामा दिला होता.२००० साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.निवृत्तीनंतरही ते शरद पवारांसोबत राहिले.
त्यांनी राजकारणासह शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले होते.भेगडे यांच्या जाण्याने मावळच्या सामाजिक, राजकीय तसेच शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आली.
संयमी नेतृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे कृष्णराव भेगडे हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून ते कार्यरत होते.संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघात त्यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली होती असेही समजते.