उत्रौली ता.भोर गावच्या हद्दीत रामबाग रस्त्यावरील ऐतिहासिक चित्रपटाच्या शुटिंगचे साहित्य असलेल्या पाच गोडावूनला आग लागल्याने ८ ते १० लाखांचे साहित्य जळून खाक झाले.
बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली.
भोर तालुक्यातील उत्रौली येथील जगन शेटे यांची पाच गोडावून ऐतिहासिक चित्रपट निर्मात्या कंपनीने भाड्याने घेतली होती. या गोडावूनमध्ये पावनखिंड या चित्रपटासह ऐतिहासिक चित्रपटाला लागणारे तंबू ,तलवारी, ढाल, दांडपट्टे, पेटारे, लोखंडी झुंबर, लाकडी फर्निचर, पुतळे असे साहित्य होते.
बुधवारी दि १ जूनला सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागून दोन सिलेंडरचा स्फोट होवून संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
भोर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी सागर पवार, ऋषी शेटे, आकाश सागळे, दत्तात्रय पवार, आमिर आतार यांच्यासह सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व पोलीस कर्मचा-यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.