डाँक्टरांनी मृत घोषित केलेले आजोबा झाले चक्क जिवंत;
कोल्हापूरमधील प्रकार
कोल्हापूर:-कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावड्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. आजपर्यंत रस्त्यांवरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरले आहेत. मात्र कसबा बावड्यातील एका आजोबांना रस्त्यावरील खड्यामुळे जीवदान मिळाल्याचा प्रकार समोर एला आहे. डॉक्टरांनी या आजोबांना मृत घोषित केले होते. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती. मात्र रुग्णालयातून घरी नेत असताना आजोबा चक्क जिवंत झाले आहेत.
एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा याठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे १६ डिसेंबर रोजी सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.
पांडुरंग तात्यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरी आक्रोश सुरू झाला. एक-एक करून उलपे कुटुंबीयांचे नातेवाईक जमा होऊ लागले. तात्यांच्या अंत्यविधीची तयारीही सुरू झाली. रूग्णवाहिकेतून तात्यांचे पार्थिव घरी घेऊन जाऊ लागले. मात्र, रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रूग्णावाहिकेला चांगलाच दणका बसला आणि तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. हे पाहून रूग्णवाहिकेतील लोक आश्चर्यचकीत झाले. तात्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या डॉक्टरांनी तात्यांना मृत घोषित केले होते, ते जिवंत झाले होते. नंतर तेच तात्या अर्थात पांडुरंग उलपे आपल्या पायानं घराकडे चालत आले. एक म्हण आहे, ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा प्रकार पांडुरंग तात्यांच्या निमित्तानं घडला आहे.