छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात
साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांचे निमगाव भोगी येथे प्रतिपादन
शिरूर:-
आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, अपयश आपली पाठ सोडत नाही तेव्हा माणूस नैराश्यात जातो. अशा प्रसंगी छंद माणसाला त्यातून बाहेर येण्यास मदत करतात.सुंदर जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कोणता ना कोणता छंद जडला पाहिजे.छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी निमगाव भोगी येथे केले.
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव भोगी येथे सप्तदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त पाच दिवसीय ज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कवितांची मेजवानीही विद्यार्थ्यांना यावेळी अनुभवायला मिळाली.
सरपंच उज्वला इचके, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पावसे, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी भोस, मुख्याध्यापक सुभाष गागरे, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, उपसरपंच लक्ष्मण सांबारे, सचिन रासकर, माजी सरपंच सुप्रिया पावसे,माजी सरपंच सचिन सांबारे, बाबासाहेब इचके, खामकर सर, रामभाऊ रासकर, माने सर, गाजरे सर, उपाध्यक्ष रेणुका राऊत, ताराबाई रासकर, उज्वला इचके, आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून त्यांनी काव्यनिर्मितीची पार्श्वभूमी समजून सांगितली. तसेच कविता कशी तयार होते? तिचे प्रकार कोणते? हे सांगत त्यांनी कळो निसर्ग मानवा, येते जगाया उभारी, आजोळ आणि मामाच्या मळ्यात या कविता विद्यार्थ्यांना गाऊन दाखवल्या. त्यावेळी सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्या कविता ऐकत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना दाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगल शिंदे, ज्ञानेश्वर नरवडे, मालन गायकवाड, संदीप थोरात, सुचिता सोनार आदी शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )