कोंढापुरी येथे होळी सण साजरा
शिरूर :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे गुरुवार दि.१३ मार्चला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदीर पटांगणाजवळ होळी पेटवून होळी सण साजरा करण्यात आला.
गजानन माधवराव गायकवाड पाटील ,संजय बाजीराव गायकवाड पाटील यांच्या हस्ते होळीचे हळदी,कुंकू वाहून, अगरबत्ती ओवाळून, नैवेद्य दाखवून पुजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता होळी पेटविण्यात आली. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक विजयराव ढमढेरे, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे संचालक सुखदेव आनंदराव गोगावले, चिंतामण सतिशराव गायकवाड, शामराव नामदेव गायकवाड, शिवाजीराव केरू गोगावले, कुंडलिकराव पठारे, बंडूजी अंकुशराव गायकवाड,अनिल विनायकराव गायकवाड या ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी पेटविण्यात आली.
होळी पेटविल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी होळीला हळदी,कुंकू वाहून, नैवेद्य ठेवून, अगरबत्ती ओवाळून होळीचे दर्शन घेतले.
होळी पेटविल्यानंतर पेटविलेल्या होळीला ग्रामस्थांनी प्रदक्षिणा घातली.
होळी सणाविषयी अशी कथा सांगितली जात आहे, हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मिळविले.त्यानंतर हिरण्यकश्यपूने पृथ्वीला पाताळी नेण्याचा प्रयत्न केला मात्र विष्णूने वराहाचा अवतार धारण करून त्याचा हा प्रयत्न फोल केला.त्यामुळे हिरण्यकश्यपू भडकला.त्याने आपल्या राज्यात विष्णूचे कोणी नाव घेवून नये असे फर्मान बजावले.
हिरण्यकश्यपू स्वत:ला श्रेष्ठ समजत होता.देवतांविषयी त्याला तिरस्कार होता.पण आश्चर्य असं त्यांच्याच घराण्यात भक्त प्रल्हाद जन्माला आला.हा प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णू भक्त होता. स्वत:चे वडील हिरण्यकश्यपू विष्णूचा तिरस्कार करतात हे त्याला ठाऊक होते.ही संपूर्ण सृष्टी विष्णूचीच आहे हे त्याला ठाऊक होते.प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचं नामस्मरण करी.मात्र हे हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते.त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.परंतू प्रत्येक वेळी तो अपयशी झाला. सगळे प्रयत्न करून थकलेल्या हिरण्यकश्यपूला त्याची बहीण जिचं नाव होलीका होतं. ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही.मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे आग मला जाळू शकत नाही.मी प्रल्हादाला घेवून अग्नित बसते.मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही.प्रल्हाद जळून खाक होईल.हे ऐकून हिरण्यकश्यपूने गावात वाळलेल्या काटक्यांची मोठी पेंढी तयार करून त्या पेंढीवर प्रल्हादाला घेवून होलीकेला बसायला सांगितले.शिपायांनी आग लावली.होलीका आपल्या वरदानाच्या धुंदीत होती. प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटे घडू लागले.होलीकेचे अंग जळू लागले.अंगाचा दाह होवू लागला .प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता.होलीका जळून खाक झाली.प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला.त्याच्या भक्तीने प्रसन्न होवून विष्णूने शेवटी खांबातून नृसिंहाचा अवतार घेवून हिरण्यकश्यपूचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची प्रथा सुरू झाली अशी कथा सांगितली जात आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )