वांझोळे येथील सचिन वाजे यांचा प्रामाणिकपणा
देवरुख बाजारपेठेत सापडलेली सोन्याची अंगठी देवरूख पोलीस ठाण्यात केली जमा
देवरुख पोलीसांनी शहानिशा करून अंगठी मुळ मालकाला केली सुपूर्द
देवरुख :- आजही काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा टीकून आहे. याचा प्रत्यय संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमध्ये आला आहे. वांझोळे गवळीवाडी येथील सचिन तुकाराम वाजे हे आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यांना देवरूख बाजारपेठेतील लक्ष्मी बेकरीजवळ रस्त्यावर सोन्याची अंगठी पडलेली दिसली. त्यांनी ही अंगठी प्रामाणिकपणे देवरूख पोलीस ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर सचिन वाजे यांनी अंगठी प्रामाणिकपणे देवरूख पोलीस ठाण्यात जमा करून आजच्या युगातही प्रामाणिकणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वांझोळे येथील सचिन वाजे हे रत्नागिरी येथील डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेत कामाला आहेत. ते सुट्टीचा दिवस वगळता दररोज वांझोळे ते रत्नागिरी अपडाऊन करतात. यासाठी ते रत्नागिरी येथे कामाला जाण्यासाठी वांझोळे येथून आपल्या मोटारसायकलने देवरूख येथे येतात व तेथून ते बसने रत्नागिरी येथे जातात. कामावरून सुटल्यानंतरही ते रत्नागिरीहून बसने देवरूखमध्ये आल्यानंतर मोटारसायकलने घरी जात असतात. दि. ३१ जानेवारी रोजी ते रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास कामावरून मोटारसायकलने घरी परतत असताना देवरूख बाजारपेठेतील लक्ष्मी बेकरीजवळ रस्त्यावर सोन्याची अंगठी पडलेली त्यांना दिसली.
यानंतर त्यांनी ही अंगठी प्रामाणिकपणे देवरूख पोलीस ठाण्यात जमा केली. व अंगठीच्या मालकाचा शोध घेण्याची पोलीसांना विनंती केली. यावेळी देवरुख पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपाली कळमकर यांनी सचिन वाजे यांना चांगले सहकार्य केले. यानंतर पोलीसांनी तात्काळ या अंगठी मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी देवरूख मधलीआळी येथील शंकर मोहन गायकवाड यांनी देवरूख पोलीस ठाण्यात जावून आपली सोन्याची अंगठी हरवली असल्याचे सांगितले. यानंतर पोलीसांनी त्यांच्याजवळील अंगठीच्या कागदपत्रांची तपासणी केली व सर्व शहानिशा केल्यावर अंगठी मुळ मालक शंकर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सचिन वाजे उपस्थित होते. तर आपली हरवलेली अंगठी प्रामाणिकपणे देवरूख पोलीस ठाण्यात जमा करणाऱ्या सचिन वाजे व देवरूख पोलीसांचे शंकर गायकवाड यांनी आभार मानले आहेत.