हॉटेलचालकाच्या हातातील पिशवी हिसकावून दुचाकीवरील दोघांनी ३ लाख रूपये चोरून नेल्याची घटना शिक्रापूर ता.शिरूर येथील पाबळ चौकात घडली.
चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून चोरीच्या या घटनेबाबत शिरूर तालुक्यातील पारोडी येथील हॉटेल व्यावसायिक रोहिदास शिवले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हॉटेल व्यावसायिक रोहिदास शिवले हे शिक्रापूर येथील पाबळ चौकातील ऍक्सिस बँकेत पैसे काढण्यासाठी त्यांच्या मुलासह आले होते. त्यांनी बँकेतून ५ लाख रूपये काढले. त्यानंतर त्यांचा मुलगा २ लाख रूपये घेवून गेला. रोहिदास शिवले हे त्यांच्याजवळील पिशवीमध्ये ३ लाख रूपये ठेवून दुचाकीवरून पैसे घेवून चालले होते.
अचानकपणे दोन युवक तोंडाला रूमाल बांधून दुचाकीवरून त्यांच्याजवळ येत शिवले यांच्या हातातील पिशवी घेवून भरधाव वेगाने चाकण चौकाच्या दिशेने पळून गेले.
या घटनेबाबत शिक्रापूर पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता सीसीटीव्हीमध्ये दोन अज्ञात चोरटे कैद झाल्याचे दिसून आले.
शिक्रापूर पोलीसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, पोलीस शिपाई अविनाश पठारे या घटनेचा तपास करीत आहेत.