अनधिकृत बॅनरप्रकरणी कडोंमपाने सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करू नयेत - माजी आमदार नरेंद्र पवार
कायदेशीर नोटीस देऊन वेळ देण्याची नरेंद्र पवार यांची मागणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करत आहे, ते कौतुकास्पद आहे, मात्र गेली महिनाभर महानगरपालिका करत असलेली कारवाई ही जणूकाही सूडबुद्धीने करत असल्याचा संशय आहे, कारण सामान्य नागरिक विविध कार्यक्रम अथवा जाहिरातीचे लावत असलेल्या बॅनरवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जात आहेत, ज्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे, अनधिकृत बॅनरवर कारवाई जरूर करावी मात्र गुन्हे नोंद करण्याच्या अगोदर कायदेशीर नोटीस देऊन अवगत करावे अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केली.
सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे, बॅनरवर कारवाई करत असताना अगोदर कायदेशीर नोटीस दिली तर नागरिक स्वतःहून बॅनर काढून घेतील. गेली महिनाभर अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्या संदर्भात शहानिशा करून ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशीही मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.