ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर व फ्रंटलाईन वर्कर्सनी बूस्टर डोस घ्यावा
Raju Tapal
January 11, 2022
33
ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर व फ्रंटलाईन वर्कर्सनी बूस्टर डोस घ्यावा : महापौर नरेश म्हस्के
ठाणे, ता. 10 : शासनाच्या निर्देशानुसार आजपासून ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे, बूस्टर डोससाठी लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक असून सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, हेल्थवर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सने बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.
आज महापौर नरेश म्हस्के यांनी बूस्टर डोससाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर भेट दिली. ठाणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत् ठाणे शहरात 53 ठिकाणी बूस्टर डोसचे नियोजन केले असून सद्यस्थितीत 60 वर्षावरील सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस मोफत देण्यात येत आहे. लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 39 आठवडे (9 महिने) पूर्ण झालेल्या नागरिकांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. कोविन ॲपवर नोंदणी करुन किंवा वॉक इन सुद्धा नागरिक बुस्टर डोस घेवू शकतात, लसीकरण केंद्रावर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व पडताळणी करुन बूस्टर डोस दिला जात आहे. बूस्टर डोसच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
लसीचे दोन डोस किंवा बूस्टर डोस घेतल्यानंतरही नागरिकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, गर्दीची ठिकाणे टाळावीत या नियमांचे पालन करावयाचे आहे. सद्यस्थितीत मास्क हाच महत्वाचा पर्याय असून विनामास्क नागरिकांनी फिरू नये असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केले आहे. तसेच अद्यापही ज्या नागरिकांनी आपले लसीकरण करुन घेतले नाही, त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. लस घेतल्याने कोणताही त्रास होत नसून लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.
Share This