जेष्ठ साहित्यिक बी के मोमीन कवठेकर वय - ७९ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार असून लोककलेतील त्यांच्या ५० वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठित विठाबाई नारायणगावकर ५ लाख रूपयांच्या पुरस्काराने त्यांना गौरविले होते.
कवठेकरांच्या लेखणीतून अवतरलेले साहित्य प्रकारात गण, गवळण, लावण्या, भावगीते, भक्तीगीते, भारूडे,सद्यस्थिती वर्णन करणारी लोकगीते ,पोवाडे, कविता,बडबडगीते,कलगीतुरा, दैशभक्तीपर गीते, मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, मराठी गाण्यांसाठी गीतलेखन, जनजागृती करणारी गीते आहेत. त्यांची हुंडाबंदी,व्यसनबंदी, एडस् , व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मुलन,साक्षरता अभियान ही नाटके आकाशवाणीवर प्रसारित झाली आहेत.
भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर,सुशीला मला क्षमा कर, बाईन दावला इंगा, इष्कानं घेतला बळी, तांबड फुटलं रक्ताचं ही त्यांची वगनाट्य आहेत.त्यांच्या ऐतिहासिक नाटकांमध्ये वेडात मराठे वीर दौडले सात, लंका कुणी जाळली, भंगले स्वप्न महाराष्ट्रा कविता संग्रहात प्रेमस्वरूप आई याचा समावेश आहे.
कलावंतांना शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी मोमीन यांनी मोठा संघर्ष केला होता .