अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन झालं आहे. ते 100 वर्षांचे होते.
कार्टर अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ जिवंत असलेले माजी अध्यक्ष होते.
नुकताच त्यांनी ऑक्टोबरमध्ये 100 वा वाढदिवस साजरा केला होता.
कार्टर यांनी जगभरात लोकशाही आणि मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेत कार्टर सेंटरची स्थापना केली होती. याच केंद्राने कार्टर यांच्या निधनाला दुजोरा दिला.
या पार्श्वभूमीवर जिमी कार्टर आणि त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांचा वेध घेणारी ही गोष्ट.
"कार्टर साहेब गावात आले तेव्हा त्यांना हरियाणवी पगडी घालण्यात आली. त्यांच्या पत्नीला चेहऱ्यावर पदर घेण्यासाठी ओढणी देण्यात आली."
दिल्लीच्या जवळील गुरुग्रामपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या 'कार्टरपुरी' गावातील रहिवासी तुम्हाला अशा आठवणी पुन्हा पुन्हा सांगतात.
चाणक्यपुरी, शारदापुरी, विकासपुरी आणि कल्याणपुरी अशी दिल्लीतील आणि आसपासच्या भागांची नावं तुम्ही ऐकली असतील. मात्र, भारतातील एका गावाचं नाव अमेरिकेच्या अध्यक्षाच्या नावावर ठेवलं आहे, असं तुम्ही ऐकलं आहे का?
गुरुग्रामजवळ वसलेल्या एका गावाचं नाव 'कार्टरपुरी' आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर आणि या गावाचं जुनं नातं आहे. या नात्यामुळं या गावाचं नाव बदलून कार्टरपुरी झालं.
3 जानेवारी 1978 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर त्यांच्या पत्नी रोझलिन कार्टर यांच्यासोबत या गावात पोहोचले. त्यानंतर या गावाचा संपूर्ण नकाशाच बदलला.
त्यावेळी ग्रामपंचायत असलेल्या या गावाचा समावेश महापालिकेत झाला आहे. असं असलं तरी आजही 'कार्टर साहेब' यांच्याबद्दलच्या आठवणी गावकऱ्यांच्या मनात घर करून आहेत.
जिमी कार्टर यांची आई लिलियन कार्टर भारतात नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांनी मुंबईतील विक्रोळी येथे काम केलं.
लिलियन कार्टर यांनी 21 महिने विक्रोळीतल्या गोदरेज कॉलनीत काम केलं. त्यांनी कुष्ठरोगाच्या रुग्णांवर उपचार केले.
तसंच, लिलियन कार्टर हरियाणातील दौलतपूर नशिराबाद गावातही जायच्या.
नंतर लिलियन यांचे पुत्र जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष बनले आणि 1978 साली भारत दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांनी दौलतपूर नशिराबाद गावाला भेट दिली होती.
त्यानंतर या गावाचं नावही बदलण्यात आलं आणि 'कार्टरपुरी' असं ठेवण्यात आलं.
आज तुम्ही कार्टरपुरीला गेलात, तर तुम्हाला जुन्या घरांच्या जागी नवीन घरं दिसतील. गावात पंचायतीची मोठी इमारत दिसेल. 32 वर्षांपूर्वी जिमी कार्टर यांनी गावाला भेट दिली तेव्हा उपस्थित असलेल्यापैकी खूपच कमी लोक आज गावात राहतात.
अनेक लोक बाहेरून येऊन गावात स्थायिक झाले आहेत. गावात सर्व प्रकारची दुकानं आहेत. एटीएम सुविधाही आहे.
ग्रामपंचायत इमारतीसमोर मोतीराम नावाच्या व्यक्तीचं चहाचं दुकान आहे. जिमी कार्टर या गावात आले होते, तेव्हा मोतीरामही तेथे हजर होते. ते सांगतात, "आम्ही तो दिवस विसरू शकत नाही. कार्टर साहेब गावात येण्याच्या काही आठवडे आधीपासून गावाची साफसफाई सुरू होती. तेव्हा आजूबाजूला शेतं होती, पण आता शेतं राहिली नाहीत. आता सगळीकडे फक्त घरं दिसतील. गावात जाट, हरिजन, यादव आणि पंजाबी समाजाचे लोक राहतात."
मोतीराम यांच्या चहाच्या दुकानाजवळ अमरसिंह बघेल यांचं कपड्यांचं दुकान आहे. अमरसिंह बघेल गावातील अशा वडीलधाऱ्यांपैकी एक आहेत जे जिमी कार्टर यांच्या भेटीबद्दल बोलताना कंटाळत नाहीत. जिमी कार्टर यांनी गावाला भेट दिली त्या दिवशी अमरसिंह बघेल स्वतः हजर होते. ते पंचायत सदस्यही राहिले आहेत. त्यांचे वडील पूर्णा सिंह हे देखील पंचायत सदस्य होते.
अमर सिंह सांगतात, "आम्ही जिमी कार्टर यांना आमच्या गावचं सदस्य मानतो. त्यांची अनेक पत्रं पंचायतीला यायची आणि पंचायत देखील त्यांना पत्र पाठवायची. मात्र, गाव महापालिकेत गेल्यानंतर हा ट्रेंड थांबला."
कार्टर जेव्हा दौलतपूर नसीराबादला आले होते तेव्हा त्यांच्यासोबत भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि हरियाणा सरकारचे जवळपास संपूर्ण मंत्रीमंडळही गावात आले होते.
अमरसिंह सांगतात, "कार्टर आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांनी ग्रामपंचायत आणि जवळचा एक वाडाही पाहिला. कार्टर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची बैठकही झाली. त्यानंतर कार्टर यांनी स्वतः हे गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मोरारजी देसाई यांनी आम्ही या गावाचा विकास करू, असं म्हटलं."
,जिमी कार्टर आणि रोझलीन भारत दौऱ्यावर आले तेव्हा मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे स्वागत केले होते.
"रोझलिन आणि जिमी कार्टर गावात आल्यानंतर गावात आनंदाची लाट उसळली होती. आमच्या गावाच्या इतिहासातील हा एक सर्वोच्च क्षण होता. हा क्षण आम्ही कधीही विसरू शकत नाही. या कारणास्तव लोकांनी गावाचं नाव बदलून कार्टरपुरी केलं."
"रोझलिनला चेहऱ्यावर पदर घ्यायला गावातील बायकांनी शिकवलं होतं. कार्टर साहेब काही वेळाने रोझलिनच्या चेहऱ्यावरील पदर उचलून बघायचे. गावातील एका चप्पल व्यावसायिकाने त्यांना एक मऊ आणि हलक्या बुटांची जोडीही भेट म्हणून दिली होती," असंही अमरसिंह यांनी नमूद केलं.
अमेरिकन तत्कालीन अध्यक्ष, भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि सर्व मंत्री गावात येऊन गेल्यानंतर गावाचं चित्र बदलेल, असं गावकऱ्यांना वाटत होतं.
मात्र, गावाच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. हे आजही अनुभवाला येतं. गुरुग्रामच्या इतर भागाच्या तुलनेत हा भाग आजही मागासलेला दिसतो. महापालिकेत रुजू होऊनही या भागाचं रुप फारसं बदललं नाही.
अमर सिंह सांगतात, "त्या भेटीनंतर आमच्या गावात फार चांगला बदल झाला नाही. आमच्या गावातील सर्व शेती नष्ट झाली आणि आता आमच्या आजूबाजूला सेक्टरच सेक्टर आहेत. येथील पिण्याचं पाणीही अत्यंत प्रदुषित झालं आहे. गावातील लोक प्रदूषणाच्या प्रश्नाशी झगडत आहेत. सरकारने आमच्या गावाला 'आरओ'चे स्वच्छ पाणी दिले पाहिजे. आमच्या गावातील मुलींसाठी सरकारने स्वतंत्र शाळा काढावी. सुरुवातीपासूनच आमच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज आहे."
गावातील शेती संपल्यानंतर आता गावातील लोक छोटीमोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करतात. कोणी रिक्षा चालवतं, कोणी मजूर म्हणून काम करतं.
गुरुग्रामसारख्या मोठ्या शहरात हरवलेले हे गाव आपल्या जुन्या आठवणी मनात जपत आजही विकासाची वाट पाहत आहे.