कडबाकुट्टी मशीनवर जनावरांना कुट्टी करत असताना कडबा कुटी मशिनमध्ये गळ्यातील ओढणी व केस अडकून गळ्याला गळफास लागून आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथील सोनाली अजय दौंड वय - २१ वर्षे या विवाहीतेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोनाली अजय दौंड या कडबा कुट्टी मशिनवर जनावरांसाठी चा-याची कुट्टी करत असताना त्यांच्या गळ्यातील कापडी ओढणी कडबा कुट्टी मशीनचा पट्टा व पात्यामध्ये अडकून ओढली जावून डोक्याचेही केस ओढले गेल्याने सोनाली दौंड यांच्या गळ्याला गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
सोनाली यांचा सहा महिन्यापूर्वीच अजय दौंड यांच्याशी विवाह झाला होता. सोनाली यांचे माहेर कोकणातील चिपळूणचे आहे. सोनाली यांचे पती वाहनचालक आहेत. ते वाहन घेवून गुजरातमधील सुरत येथे गेले.होते. सोनाली २ आठवड्यापासून ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करू लागली होती.
सोनाली यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.