कांबा गावातील आदिवासी टिटवाळा पोलीस ठाण्यात
खदान मालक आणि आदिवासींमधील संघर्ष पेटला
कांबा गावातील दगड खदानीचा विषय पेटला असून खदान मालक आणि पोलीस आदिवासींवर खोटे आरोप करून या खदानीपासून ७० ते ७५ मिटरवर असलेले पाडे उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कांबा गावातील आदिवासी करत आहेत. काल तीन आदिवासी तरुण मुलांना पोलिसांनी अटक केल्याने गुरुवारी सकाळी टिटवाळा पोलीस ठाण्यात या आदिवासी नागरिकांनी एल्गार केला.
कांबा गावात २०१७ पासून दगड खदानी संदर्भात आवाज उठवला जात आहे. या खदानीच्या स्फोटाचा आवाज रात्री – अपरात्री त्रासदायक होत असून यामुळे घरांना अक्षरशः भेगा पडत असल्याचे या आदिवासींनी सांगितले. इतकेच नव्हे तर दगड खदानीच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार होत असून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत देखील या खदानीतील धूळ जात असल्याचा आरोप या आदिवासींनी केला आहे. यावेळी गावातील तीन तरुण मंडळींना पोलिसांनी खदान मालकांच्या सांगण्यावरून अटक केली असून गुरुवारी आम्ही या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होतो अशी माहिती गावातील आदिवासीयांनी दिली. नेमकी याची माहिती खदान मालकांना मिळाली. त्यामुळे बुधवारी रातोरात तीन तरुण कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी गावातील सर्व आदिवासी टिटवाळा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांना सोडलं नाही तर आम्हाला पण अटक करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.