कॅन्सरशी झुंज देणार्या चिमुकल्या काव्या शेळकेचे निधन
आचरा (मुळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु.काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने गेले पंधरा दिवस तिच्यावर गोवा-बांबूळी येथे उपचार सुरु होते.शुक्रवारी रात्री अचानक काव्याची प्रकृती अचानक खालवल्याने तिला रात्री अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. शनिवारी पहाटे दुर्धर आजाराशी झगडणार्या चिमुकल्या काव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेळके कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे काव्याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. काव्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आलेत. पैसे सुद्धा जमा झाले होते. काव्या बरी व्हावी म्हणून अनेकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा ओघ चालू ठेवला होता. काव्या बरी व्हावी म्हणून अनेकजण देवाकडे साकडे घालत होते.अखेर मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. शनिवारी पहाटे उपचारदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. काव्या हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी व इतर नातेवाईक आहेत.