कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एकुण 15,655 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन !
सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवात,काल कल्याण डोंबिवलीतील श्री गणेशाचे विसर्जन शांततामय वातावरणात पार पडले. महापालिका क्षेत्रात काल रात्री उशीरापर्यंत एकुण 15,655 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन विविध विसर्जन स्थळांवर करण्यात आले.
यामध्ये सर्व प्रभागात मिळून 3,712 शाडुच्या व 11,943 पिओपीच्या श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेकडून प्रदुषणमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना राबविली जात आहे. त्याला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यवर्षीच्या दिड दिवसाच्या श्री गणेशाच्या विसर्जनावेळी सुमारे 32% पर्यावरण पूरक श्री गणेश मुर्तींचे विसर्जन झाल्याचे दिसून येते.
दिड दिवसाच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे 18 मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. यांस श्री गणेशोत्सव मंडळांनी देखील महापालिकेस सहकार्य करुन उत्तम प्रतिसाद दिला. महापालिकेमार्फत प्रथमच गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यासाठी कल्याण मध्ये 2 डंपर व डोंबिवली मध्ये 2 डंपर्सचे (निर्माल्य रथ) नियोजन करण्यात आले होते. त्यामार्फत एकूण 2 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. याकामी विविध संस्थाचे अनमोल सहकार्य महापालिकेस लाभले.
संकलित केलेले हे निर्माल्य कल्याण येथील ऊंबर्डे मधील बायोगॅस प्रकल्पात नेवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या खत निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहे.
निर्माल्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट आता लावली जात असल्याने नदी, खाडी यामध्ये हे निर्माल्य जावून सदर जलस्त्रोत प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.