घरातील लोक किर्तनाला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बारामती तालुक्यातील खराडेवाडीतील तीन घरे फोडून दोन घरांतून दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी दि.२५ नोव्हेबरला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली.
खराडेवाडीतील भोसले वस्तीवरील शेतकरी ,सामाजिक कार्यकर्ते मधूकर एकनाथ भोसले त्यांच्या कुटूंबासह ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाला गेले होते.
घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भोसले यांच्या घरात प्रवेश करून घरातील दोन पेट्या, तसेच एका बॅगेतून सहा हजार रूपयांची रोख रक्कम काढून घेतली.
दोन्ही पेट्या ,बॅग जवळच्या शेतात फेकून दिल्या. या पेटीत कागदपत्रे होती.
उत्तम एकनाथ भोसले यांंच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील दागिने चोरून नेले.
यामध्ये दोन तोळ्याचा सोन्याचा गंठण चांदीचे पैंजण, चांदीच्या बांगड्या ,लहान मुलांचे कमरेचे चांदीचे पैंजण, सोन्याच्या दोन ग्रॅमच्या अंगठ्या , कर्णफुले, असा एकूण सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला.
सत्यवान धोंडीबा भोसले यांच्या घरातील कपाटही चोरट्यांनी खोलले मात्र हाती काही लागले नाही.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.