रेल्वेतील खासगीकरण तातडीने बंद करा, रेल्वेला खासगी ऑपरेटरकडे सोपविण्याचा निर्णय मागे घ्या, पदोन्नतीमधील आरक्षण सुरक्षित करण्याकरिता ११७ वे संशोधन विधेयक पारित करा, रिक्त पदांची भरती करा आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने पुणे रेल्वेस्टेशनजवळील पुणे मंडल डी आर एम ऑफिस समोर आंदोलन करण्यात आले.
असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी एल बैरवा, असोसिएशनचे महामंत्रीअशोककुमार, मध्य रेल झोनल अध्यक्ष बी के खोईया, सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या आंदोलनात पुणे विभागाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, कार्यकारी अध्यक्ष विशाल ओव्हाळ, सचिव नितीन वानखेडे, रोहन राजगुरू, दिनेश कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्र सरकारमार्फत रेल्वेच्या खाजगीकरणाचा घाट घालण्यात येत असून भाडेतत्वावर विविध रेल्वेस्टेशन , हिल स्टेशन, ट्रेन गोदाम, कोकण रेल्वे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र खासगीकरणामुळे रेल्वे नोकरीत एस सी एस टी प्रवर्गातील लोकांना आरक्षण मिळू शकणार नाही. त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मध्य रेल्वेत आरक्षणानुसार बदली व पदोन्नतीत एस सी एस टी प्रवर्गास रेल्वे बोर्डाचे आरक्षण नियमावलीप्रमाणे संधी न देता डावलण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डी ओ पी टी व रेल्वे बोर्ड आदेशानुसार एस सी एस टी कर्मचा-यांची पोस्टींग करण्यात यावी ,ट्रेड अप्रेन्टिस कायद्यानूसार अभ्यासक्रम पूर्ण करणा-या कर्मचा-यांना रेल्वेसेवेत समाविष्ट केले जावे, २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गसाठीचे आरक्षण वाढवून १७ टक्के व ९ टक्के करण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिका-यांनी पत्रकारांना सांगितले.
रेल्वे खासगीकरणामुळे कर्मचा-यांवर खासगी मनमानी वाढेल, कर्मचा-यांविरोधात चुकीचे निर्बंध व नियम लागू करण्यात येतील रेल्वे खासगीकरण रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांच्या दृष्टीनं फायद्याचे ठरणार नाही असे मत असोसिएशनचे सचिव नितीन वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केले.