खोडद चौकात झालेल्या अपघातातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको
पुणे नाशिक महामार्गावर खोडद बायपास चौकात भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर गाडीने उडविलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोडद व हिवरे येथील नागरिकांनी रास्ता रोको केला.
कल्पना योगेश भोर वय - २८ रा.हिवरेतर्फे नारायणगाव असे अपघातातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नाव आहे.
योगेश किसन भोर व त्यांची पत्नी कल्पना हे मंगळवार दि.२३ नोव्हेबरला योगेशची बहीण संगिता कोरडे हिला दवाखान्यातून घेवून येत होते. पुणे - नाशिक महामार्गावरील बायपास चौकात भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर गाडीने त्यांना उडविल्याची माहिती प्रकाश आबाजी भोर यांनी पत्रकारांना दिली. या घटनेत योगेश व त्यांची पत्नी कल्पना बहिण संगिता हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान कल्पना यांचा २६ नोव्हेबरला मृत्यू झाला.
बायपासला खोडद चौकामध्ये उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी खोडद व हिवरे येथील नागरिकांनी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून महिलेचा अंत्यविधी चौकातच करण्यासाठी रास्ता रोको केला.
तहसीलदार रविंद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रवादीचे नेते अमित बेनके, सरपंच बाबू पाटे, सुरज वाजगे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
याठिकाणी स्पीड ब्रेकर असूनही वाहने वेगात जातात .या चौकात दिवे नाहीत .शाळा सुरू झाल्यामुळे शाळकरी मुलांच्या जाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. उड्डाणपुलाची मागणी होती. मात्र ती मंजूर झाली नाही. आमदार,खासदार जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.