नारायणगाव येथील मीना नदीजवळील हरिहरेश्वर मंदीराजवळ झालेल्या खूनप्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग व नारायणगाव पोलीसांनी अटक केली.
पिंटू उर्फ रामदास तुकाराम पवार रा.वैष्णवधाम सध्या रा.वैष्णवधाम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो हरिहरेश्वर मंदीरात दिवाबत्ती करण्याचे काम करत होता.
संभाजी उर्फ गोविंद बबन गायकवाड रा.येणेरे यांचा शुक्रवारी दि.१३ मे २०२२ रोजी हरिहरेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या शेतात खून करून त्यावर चादर टाकून आरोपी फरार झाला होता.
याबाबत तानाजी गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके व नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दोन पथके तयार करून तपासकामी रवाना केले.
आरोपी हा जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात वरसावनेच्या डोंगरामध्ये लपून बसला आहे अशी माहिती मिळाल्यानूसार त्याआधारे रात्रीच्यावेळी १० ते १२ किलोमीटर डोंगरात शोध घेत असताना पोलीसांची चाहूल लागल्याने संशयित पिंटू निघून गेला. दुस-या दिवशी आरोपी घोडेगाव - भीमाशंकर येथे जंगलात गेल्याची माहिती मिळाल्याने तेथील स्मशानभूमीतून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने खून केल्याची कबूली दिली असून नारायणगाव पोलीस तपास करत आहेत.