मद्यपी वाहनचालकाची ३ दूचाकी, २ चारचाकींना धडक ; उरूळी कांचन येथील अपघातात तीन जण जखमी
पुणे - सोलापूर महामार्गावर उरूळीकांचन येथे कंटेनर चालकाने तीन दुचाकी व दोन चारचाकी वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले.
माऊली रविंद्र झिरोळे, अंकुश बाळू गायकवाड, दिपक सुभाष भालेराव अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून अशोक भिकाजी वेरागे वय -३७ रा.माळीमळा ,लोणीकाळभोर यांनी या अपघाताबाबत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक प्रदीप रामकृष्ण वायरे वय - २४ रा.वर्धा याला अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार वैरागे हे पिकअप ड्रायव्हर म्हणून काम करत असून पिक अप ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीस करारावर असून ती बारामती ते पुणे , पुणे ते बारामती अशी घेवून जात असतात. १५ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते उरूळी कांचन गावच्या हद्दीत सोलापूर - पुणे महामार्गावर तळवडी चौक येथे पोहोचले. ट्रॅफिक पोलीस तेथे वाहतूकीचे नियोजन करत होते.
त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पाठीमागील बाजूला मोठा आवाज आल्याने त्यांनी खाली उतरून पाहिल्यावर एका पिक अप गाडीने तिच्या पाठीमागे इको गाडीस ठोस मारली होती. त्याक्षणी कंटेनरच्या डाव्या बाजूस तीन दुचाकी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस वैरागे यांना समजले की, कंटेनरचा मोठा अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जखमींना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून कंटेनरचालकास ताब्यात घेतले.