नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज
ठिकठिकाणी जय्यत तयारी;
पोलिसांची असणार करडी नजर
मुंबई:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्टकडूनही तयारी करण्यात आली आहे. यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विविध लज्जतदार पदार्थांची मेजवानीही असणार आहे. त्यासोबतच अनेकांच्या घरी हाऊस पार्टीचीही तयारी करण्यात येणार आहे. अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर बहुतांश पर्यटन स्थळांवरील हॉटेलचे बुकींग हाऊसफुल्ल झाले आहे. आज रात्री ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अन् लाईव्ह म्युझिक बँडच्या तालावर थिरकत न्यू इयर पार्टीचा जल्लोष ठिकठिकाणी केला जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही नवीन वर्षाचं जंगी स्वागत होणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेत. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करताना कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासंदर्भातील काळजी घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवर 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. 30 तारखेच्या रात्रीपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी थर्डी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि तपासणी सुरू झाली आहे.