कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या गायकवाड वस्ती ता.इंदापूर येथील बंगल्यावर दरोडा ; दीड लाख रूपयांसह १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकून दीड लाख रोख रकमेसह १५ तोळे सोन्याचे दागिने ,चांदीचा ऐवज लंपास केला.
दरोडेखोरांना प्रतिकार करत असताना कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड जखमी झाले .
मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्यामध्ये सहा दरोडेखोरांनी बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडून बंगल्यात प्रवेश केला. यावेळी गायकवाड त्यांच्या पत्नी सुनंदा, भाऊ राहूल, भावजय वैशाली यांच्यासह बंगल्यामध्ये होते.
चोरट्यांनी राजेंद्र गायकवाड यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून त्यांची पत्नी सुनंदा यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने ,अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले.
दागिने काढत असताना आम्हाला मारहाण करू नका असे सांगत असताना अचानक राजेंद्र गायकवाड यांना जाग आल्याने त्यांना लाकडी काठीने मारहाण केली. गायकवाड यांनी प्रतिकार करण्यास सुरूवात केल्यावर त्यांना धारदार शस्त्राने कपाळावर मारहाण केली. त्यांच्या कपाळावर मोठी जखम पडली असून सहा टाके पडले आहेत.
चोरटे वरच्या मजल्यावर जात असताना राहूल गायकवाड त्यांच्या पत्नी वैशाली यांनी वरून स्टीलची पाण्याची बादली फेकून मारल्याने आजूबाजूचे नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांनी दीड लाख रूपयांची रोख रक्कम सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज घेवून चोरट्यांनी पळ काढला.
वाघवस्ती येथील मल्हारी वाघ यांच्या घरावरती दरोडा टाकून घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, सहा हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली.
बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तातडीने भेट दिली.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे अधिक तपास करत आहेत.