ठाणे जिल्ह्यातील अवैध मंगूर व्यवसायांच्या ठिकाणी काल जलनायक स्नेहल दोंदे यांच्या नेतृत्वात पाहणी दौरा करण्यात आला. यावेळेस वन विभागाचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. या दौऱ्या अंतर्गत भिवंडी मधिल कुंभारशीव आणि शिरगाव येथील नदी लगत असलेल्या तळ्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत असे निदर्शनास आले की बहुतांश तले हे वन विभागाच्या जागेवर स्थित आहेत. मंगुर मत्स्य उत्पादनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वनविभागाने जमिनी का दिल्या, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला, तसेच 5 जानेवारी 2021 रोजी मत्स्य विभागाच्या वतीने मंगुर तळ्यांवर कारवाई होऊन देखील पुन्हा त्यापेक्षाही अधिक क्षमतेने मंगुर उत्पादन घेतले जात आहे, यास जबाबदार कोण हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला.
जिल्हा अधिकारी, वनविभाग आणि मत्स्य विभागाशी चर्चा करून या समस्येवर कायम स्वरुपी तोडगा काढला जाईल असे आश्वासन जलनायक स्नेहल दोंदे यांनी दिले.
मंगुर मत्स्य उत्पादनाऐवजी ह्या भुखंडावर शासकीय योजनांमार्फत इतर उत्पादने कशी घेता येतील ह्यासंबंधीत जलनायकांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पाण्याचा महसूल कसा बुडविला जातो हे ग्रामविकास अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यासंदर्भातील ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्यां बाबत त्यांना अवगत करण्यात आले.