मातोश्री वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण
Raju Tapal
November 29, 2021
34
खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण
त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
खडवली वृद्धाश्रमातील ६७ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही झाले आहे.
या वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही थोडी कणकण जाणवली. त्यानंतर कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. एकीकडे जिल्हा रुग्णालयात अवघ्या चार ते पाच रुग्णांवर उपचार सुरु असतांना येथील कर्मचारी वर्ग काहीसे निवांत होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान, खडीवलीतून हे रुग्ण आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.
शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी सर्व बाधितांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करायचे असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिली. त्यानुसार डॉ. पवार यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने हे रुग्ण दाखल करण्यासाठीची तयारी केली.
कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयातही मोजकेच रुग्ण आहेत. त्यामुळे स्टाफही कमी होता. मात्र, या रुग्णांना आणण्यापूर्वीच तातडीने वॉर्ड सज्ज ठेवून डॉक्टर-नर्स तसेच इतर कर्मचारी वर्गास तात्काळ पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
Share This