मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना जेवणातून विषबाधा ; काहींची प्रकृती चिंताजनक
Raju Tapal
November 20, 2021
33
मावळ तालुक्यातील भडवली गावात काकडा आरती काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम संपल्याऩतर ग्रामस्थांसाठी करण्यात आलेल्या जेवणातुन ४० ते ४५ नागरिकांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला.
बाधित रूग्णांना काले पवनानगर येथील ग्रामीण रूग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही रूग्णांची प्रकृती स्थिर असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेश असून काही रूग्णांना कान्हेफाटा येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.वर्षा पाटील, डॉ.विश्वंभर सोनवणे, डॉ.पोपट आधाते, डॉ. शिवराज वाघमारे उपचार करत आहेत.याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जुलाब, उलट्या, पोट दुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशी लक्षणे रूग्णांमध्ये दिसून आली.
रूग्णालयात साधारणत: २८ ते ३० रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५ ते ६ रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
लॉकडाऊनपासून बंद असलेल्या टाकीमध्ये स्वच्छ न करता पाणी भरल्याने विषबाधा झाली. मंदिराजवळ असलेल्या अंगणवाडी शाळेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी लॉकडाऊनपासून ग्रामपंचायतीने स्वच्छ केली नाही. त्यामधील खराब पाणी बाहेर न काढता त्याच टाकीमध्ये ग्रामपंचायतीने पाणी सोडले पाणी स्वयंपाक करण्यासाठी घेतले त्या खराब पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे समजते.
Share This