लोणंद येथील एच आर कॉम्पुट्रॉनिक्स या दुकानातून मोबाईल व कॅश काऊंटरमधील रोख रकमेची चोरी करणा-या चोरट्यास लोणंद पोलीसांनी अटक केली.
देविदास किसन पवार वय ३९ रा.अंजनीनगर कात्रज पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हर्षद भुजबळ या दुकानदाराने याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
२९ सप्टेंबरला लोणंद येथील हर्षद भुजबळ यांच्या खंडाळा रोडवरील दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी सुट्टे पैसै हवे आहेत असे म्हणून विक्रीसाठी ठेवलेला कपाटातील नवीन विवो कंपनीचा मोबाईल व कॅश काऊंटरमधील दोन हजार रूपये रोख असा २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हातचलाखीने चोरून नेला.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस ऊपनिरीक्षक गणेश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार , गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी पुण्यातील कात्रज व हडपसर या भागात राहाणारे असल्याचे निष्पन्न करून यातील देविदास किसन पवार यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
अधिक चौकशी करता खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँकेमध्येही चोरी केल्याचे त्याने कबूल केले.