• Total Visitor ( 133542 )

मौजे फुरसुंगी ता.हवेली येथे ऊस पाचट व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

Raju Tapal November 24, 2021 59

 महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे , उपविभागीय कृषि, पुणे व तालुका कृषि अधिकारी, हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने मौजे फुरसुंगी येथे ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग व ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात श्री.मेघराज वाळुंजकर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह चा उद्देश विशद करताना ऊसाचे खोडवा पिक घेताना ऊसाचे पाचट न जाळता सरीमध्ये जागेवरच कुजवणे आवश्यक आहे. ऊसाच्या पाचटाची कुट्टी करून झाल्यानंतर कुजविण्याची प्रक्रिया करताना जमीनीमध्ये ओलावा असताना एकरी ३२किलो युरिया, ४०किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४ लिटर पाचट कुजवणारे जिवाणूचा वापर   करणेबाबत मार्गदर्शन केले.खोडवा ऊसात पाचट व्यवस्थापन केल्याने जमीनीतील सेंद्रिय कर्बाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे जमीनीच्या सुपिकते मध्ये अमुलाग्र बदल दिसुन येतो. तसेच जमीनीमध्ये भौतिक, जैविक, रासायनिक बदल घडवुन येत असल्यामुळे जमीनीमध्ये हवा व पाणी यांचे प्रमाण योग्य राखले जाऊन जमीन भुसभुशीत व कायम वापसा स्थितीत रहाते त्यामुळे ऊसाची पांढरी मुळी वाढल्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचा वापर वाढण्यास मदत होते.जमीनीचा  सामु,विद्युत वाहकता, क्षारांचे प्रमाण, जिवाणूंच्यासंख्येत वाढ, सेंद्रियकर्बात वाढ यामध्ये सकारात्मक बदल घडवून येत असल्याने जमीनीच्या सुपिकतेत वाढ होऊन खोडवा पिकाच्या उत्पादनात एकरी ५ते ६ टनांपर्यंत वाढ होते व एकरी ४ते ६ टनापर्यत उपलब्ध होणारे ऊसाचे पाचट कुजविल्यामुळे २ते ३ टन सेंद्रिय खत जागेवरच उपलब्ध झाल्याने उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाचे पाचट व्यवस्थापन करावे असे आवाहन करण्यात आले.

   श्री. गुलाब कडलग,मंडळ कृषि अधिकारी, हडपसर यांनी खोडवा ऊस पिकातील ऊस पाचट व्यवस्थापन,ऊसाचा खोडवा निघाल्यानंतर चे पाचट व्यवस्थापन , हिरवळीचे खतांचा वापर,आंतरपिकांचा अवलंब करुन जमीनीतील सेंद्रिय कर्बाची वाढ करणेबाबत मार्गदर्शन केले. जमीनीतील सेंद्रिय कर्बाच्या पातळीवर  जिवाणुंची संख्या अवलंबुन असते जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी जमीनीतील जिवाणूंच्या संख्येत लक्षणीय वाढ होते त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.जमीनीतील विविध जिवाणू , उपयुक्त बुरशीं व त्यांचे पिक उत्पादनातील महत्त्व या बाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी करुन सेंद्रिय व जिवाणू खतांचा वापर करून पिक उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार उत्पादनावर भर देऊन ऊस, भाजीपाला, फळपिके, अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना पाचट कुजविणारे जिवाणुंचे कल्चर वाटप करण्यात आले व त्याचे वापराचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष खोडवा ऊस पिकात दाखविण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती हिरवे, कृषि सहाय्यक, कदमवाक वस्ती यांनी केले तसेच श्रीमती मुक्ता गर्जे, कृषि सहाय्यक, लोणी काळभोर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिकचे आयोजन प्रयोगशिल शेतकरी श्री.बापु आबुराव भेलुसे यांच्या शेतावर घेण्यात आले त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य,श्री बाजीराव आबा सायकर ,प्रगतशिल शेतकरी,श्री. बाळासाहेब पवार, श्री.सतीष हरपळे,श्री.उत्तम दुंडे ,श्री.सतीष पवार,श्री.राणुजी झेंडे ,श्री.माऊली हरपळे,श्री.दादा हरपळे,श्री शामराव पवार ,वडकी ग्रामपंचायत चे सदस्य श्री मछिंद्र गायकवाड,श्री.रवि मोडक व परिसरातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share This

titwala-news

Advertisement